उन्हाळ्याच्या तलखीनंतर येणारा पाऊस सुखावणारा असला, तरीही या ऋतूमध्ये अनेक आजारांना आमंत्रणही मिळते. पावसाळ्यात सर्दी, खोकला, पायाला संसर्ग होणे, पोटात संसर्ग होणे, फ्लू, अन्नातून विषबाधा, मलेरिया, डायरिया यासारख्या आजारांचा धोका वाढतो. ज्या व्यक्तींची प्रतिकारकक्षमता कमी असते त्यांना आजारांचा धोका सर्वाधिक असतो.
पावसाळ्यात चटकमटक, तेलकट पदार्थ खाण्याची इच्छा होते. मात्र, याच मोसमात आहारावर नियंत्रण न ठेवल्यास चटकन संसर्ग होण्याची शक्यता असते. पावसाळ्याच्या काळात कोणता आहार घ्यावा आणि कोणते पदार्थ टाळावेत हे जाणून घेऊया. पावसाळ्याच्या काळात आपण आहारतक्ताच बनवू शकतो.
मोडाची धान्ये : पावसाळ्यात रोजच्या रोज 1 वाटी मोडाची धान्ये खाल्ली पाहिजेत. त्यामुळे तंतुमय पदार्थ, पोटॅशियम, फोलेट, सी जीवनसत्त्व, तसेच के जीवनसत्त्व मिळतात. त्यामुळे पावसाळ्यात भासणार्या समस्या दूर होण्यास मदत होते.
ब्रोकोली : ब्रोकोलीमध्ये सी जीवनसत्त्व असते. प्रतिकारकक्षमता मजबूत करण्याबरोबरच फ्लू, सर्दी, खोकला आणि अन्नातून विषबाधेसारखे आजार होत नाहीत.
सफरचंद : आजारांपासून बचाव करण्यासाठी पावसाळ्यातच नव्हे, तर रोजच एक सफरचंदाचे सेवन केले पाहिजे. इंग्रजीत म्हणतात ना अॅन अॅपल अ डे किप्स डॉक्टर अवे. सफरचंदात खनिजे, कॅल्शियम, लोह, सी जीवनसत्त्व आणि ए जीवनसत्त्वाचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे अनेक प्रकारच्या संसर्गापासून बचाव होतो.
हिरवी मिरची : अँटिऑक्सिडंट आणि सी जीवनसत्त्व यांचा उत्तम स्रोत आहे. हिरवी मिरची योग्य प्रमाणात सेवन केल्याचे अनेक फायदे असतात. स्वयंपाक करताना हिरव्या मिरचीचा वापर करावा. त्याशिवाय सलाडमध्ये घालूनही हिरवी मिरची खाऊ शकता.
आवळा : आवळ्याचा मुरंबा, कच्चा आवळा किंवा आवळ्याचा रस
प्यायल्यास प्रतिकारकशक्ती मजबूत होते. त्यामुळे इन्फेक्शनपासून आपला बचाव होतो. त्याशिवाय पचनसंस्थाही योग्यप्रकारे कार्य करते.
टोमॅटो : पावसाळ्यात रोज एक टोमॅटो जरूर सेवन केला पाहिजे. त्यामुळे प्रतिकारकशक्ती वाढतेच, शिवाय पावसाळ्यात होणार्या आजारांपासून बचाव होतो. टोमॅटोचे सूप किंवा रस काढून पिऊ शकता.
जर्दाळू : जर्दाळूमध्ये इतर फळांच्या तुलनेत दुप्पट प्रमाणात सी जीवनसत्त्व आणि तंतुमय पदार्थ आहेत. सुका जर्दाळू रोज खाल्ल्यास पावसाळ्यात लहान-मोठ्या समस्यांपासून बचाव करता येईल. त्याशिवाय जर्दाळूचे सेवन केल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवता येते.
या गोष्टींचे पथ्य पाळावे
पावसाळ्याच्या काळात फास्टफूड आणि रस्त्यावरील पदार्थ खाणे टाळावे. रस्त्यावरील पदार्थांत अनेक जीवाणू असतात, त्यामुळे आजार होण्याचे प्रमाण वाढते. या हवेत आंबट पदार्थ जसे लोणचे, चिंच खाऊ नये. आंबट पदार्थ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता वाढते.
कोबी आणि पालक : या हवेत कोबी आणि पालक यांची भाजी खाणे शक्यतो टाळावे. कारण, या भाज्यांमध्ये लहान लहान किडे असतात. त्यामुळे अशा भाज्या सेवन केल्यास पोट खराब होण्याची शक्यता असते.
भाज्यांचे सेवन : पावसाळ्यात बटाटा, अरवी, भेंडी आणि मटार यांचे सेवन क डिग्री नये. पावसाळ्यात पचनक्रिया कमजोर होते, त्यामुळे या भाज्या पचवण्यासाठी अधिक ऊर्जा लागते. त्यामुळे पचनसंस्था खराब होते.
मशरूम : या हवेत मशरूमचे सेवन क डिग्री नये. कारण, मशरूममध्ये जीवाणूंचा संसर्ग होण्याचा धोका असतो.
काकडी : उन्हाळ्यात काकडी शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. पावसाळ्यात मात्र त्यात कीड होण्याचा धोका असतो. हीच कीड शरीरात जाऊन नुकसान होऊ शकते. त्यामुळे या काळात काकडीचे सेवन कमी करावे.
चटपटा आणि तिखट जेवण : पावसाळ्यात कितीही चटकदार पदार्थ खाण्याची इच्छा असली, तरी खूप जास्त तेलकट, तिखट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. कारण, पचनशक्ती मंदावलेली असल्याने या पदार्थांनी पोट खराब होते, शिवाय संसर्गही खूप लवकर होतो.
याही गोष्टी लक्षात ठेवा
जेवणाबरोबर सलाडचे सेवन अवश्य करावे. सलाडमुळे पचनक्रिया योग्य राहण्यास मदत होते. पचायला सोपे असतेच; पण पौष्टिकही असते.
पावसाळ्यात जेवण लवकर पचत नाही, त्यामुळे जेवण योग्य पद्धतीने शिजवून खावे.
पावसाळ्याच्या ऋतूत पाणी अशुद्ध होण्याचा सर्वात जास्त धोका असतो, त्यामुळे फिल्टर्ड पाणी आणि उकळलेले पाणी प्यावे. त्याशिवाय पाणी शुद्ध करण्यासाठी पाण्यात क्लोरिन घालता येते.
मंजिरी फडके